
कर्नाळादेवी तलाव ते गौरीपाडा दत्तमंदिर काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न – आमदार निधीतून १ कोटींचा निधी मंजूर
- Rohit R. Shukla, Journalist
- Jul 10, 2025
- 22 views
कल्याण : प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत येणाऱ्या गौरीपाडा परिसरातील नागरिकांची दीर्घकाळची मागणी अखेर पूर्णत्वास जात आहे. कर्नाळादेवी तलाव ते गौरीपाडा दत्तमंदिर दरम्यानच्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामासाठी भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. या महत्त्वपूर्ण कामासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या विकासकामासाठी भारतीय जनता पार्टीचे विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्यामुळे विशेष मदत मिळाली असून, आमदार विश्वनाथ भोईर साहेबांनी या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी निधी मंजूर करून स्थानिक नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीकडे सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
भूमिपूजनाचा विधी माजी आमदार नरेंद्र पवार आणि युवासेना जिल्हा चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती आणि नागरिकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी नगरसेवक दया गायकवाड, श्याम मिरकुटे, युवासैनिक प्रशांत म्हात्रे, सुभाष मिरकुटे, विजय म्हात्रे, साईनाथ म्हात्रे, भावना मनराजा, संगीता पाटील, पौर्णिमा मोरे तसेच इतर अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नागरिकांनी आमदार विश्वनाथ भोईर यांचे मनापासून आभार मानले असून, लवकरात लवकर काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
कर्नाळादेवी तलाव ते दत्तमंदिर दरम्यानचा रस्ता पूर्वी खड्यांनी भरलेला आणि खराब अवस्थेत होता. पावसाळ्यात त्यावरून चालणे कठीण जात होते. या रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे नागरिकांना प्रवासात दिलासा मिळणार आहेच, तसेच परिसराचा देखील विकास होण्यास हातभार लागणार आहे.
हा विकासक्रम भाजप आणि युवासेनेच्या पुढाकाराने साध्य झाला असून, लोकप्रतिनिधींनी दिलेला शब्द पाळत ठोस कृतीतून कामाची सुरुवात केली आहे. स्थानिक विकासाला चालना देणारे हे काम भविष्यातील योजनांसाठी एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.
रिपोर्टर