डोम्बिवलित मराठी-हिंदी वादाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न?

डोंबिवलीतील मारहाण प्रकरणानंतर नागरिकांकडून संताप

डोंबिवली : डोंबिवली पश्चिम येथील सरोवरनगर परिसरातील कुबेर अंगण सोसायटीसमोर साचलेल्या सांडपाण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी ओंकारनाथ तिवारी, त्यांचा मुलगा सत्यम तिवारी आणि जय शुक्ला यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुबेर अंगण सोसायटीत राहणारे विशाल पाटील यांनी त्यांच्या घरासमोर सांडपाणी साचत असल्याबाबत समोरील सोसायटीत राहणारे ओंकारनाथ तिवारी यांना जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळातच वादाचे रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले. या घटनेत विशाल पाटील यांना मारहाण झाल्याची तक्रार करण्यात आली असून, त्यानुसार विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, एका किरकोळ शेजारी वादाला मराठी-परप्रांतीय किंवा मराठी-हिंदी वादाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, दोन व्यक्तींमधील वैयक्तिक वादाला भाषिक किंवा प्रादेशिक रंग देणे योग्य नसून, त्यामुळे समाजात अनावश्यक तणाव निर्माण होण्याची शक्यता असते.

नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाराष्ट्रात सर्व भाषिक समाज एकत्र राहत असून, वैयक्तिक वादांचे निराकरण करण्यासाठी कायदा आणि न्यायव्यवस्था सक्षम आहे. अशा घटनांना राजकीय किंवा भाषिक स्वरूप देऊन समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न थांबविण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या राजकारणामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

या प्रकरणात नेमके काय घडले, मारहाणीचे कारण काय होते आणि घटनेत सहभागी सर्वांची भूमिका काय होती, याचा तपास विष्णूनगर पोलीस करत असून, तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट